Sunday, 14 April 2013


मुझे क्या बेचेगा रुपैया???

"एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्विकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे." महोत्सव  या पुस्तकातील व. पु. काळे यांचे हे अतिशय सुंदर वाक्य आहे.एक चांगला विचार माणसाचे आयुष्य बदलू शकतो.बदलाव हा माणसाचा स्वभाव आहे.आणि चांगल्या गोष्टींसाठी बदल झाले तर हि गोष्ट कोणत्या महोत्सवापेक्षा कमी नाही.

हुंडा देणे किवा घेणे हि आपली संस्कृती आहे का? कुठून आला हा शब्द? पूर्वीच्या काळात धर्मशास्त्रात असे लिहून ठेवण्यात आले होते कि लग्न करताना नवरदेवाला वरदक्षिणा दिल्याशिवाय कन्यादान हा विधी पूर्ण होत नाही.म्हणून लग्नाच्या वेळी नवरदेवाला काहीतरी रोख रक्कम वरदक्षिणा म्हणून दिली जात असे. आणि मग हीच कन्यादानाची पद्धत म्हणून प्रचलित झाली. वधूपक्षांनी काहीतरी रक्कम किवा वस्तू स्वरुपात वरपक्षाला देणे.त्या काळी वरदक्षिणा हि प्रेमापोटी किवा जिव्हाळ्यापोटी  दिली जात असे. आज हे स्वरूप बदलून त्याची जागा एका वेगळ्याच समस्यांनी घेतली आहे.पूर्वीच्या काळी या पद्धतीत कुठलाही दबाव नसे.पण कालांतराने त्याचे स्वरूप जबरदस्तीने घेतले आहे.

हुंडयासारखी समस्या आजही समाजात ज्वलंत दिसून येते. आजही आपण हुंडयापायी नववधुंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो.पूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा होता पण आज समाजात काही वेगळेच चित्र दिसून येते. आज लढाईचे चित्र पालटले. चांगल्या विचारांचा लढा  वाईटाशी आहे.अर्थात अंतिम विजय सत्याचाच असेल.

आज एकीकडे महिला-पुरुष समानतेचा नारा दिला जातो आणि दुसरीकडे हुंडाबळी सारखी अनेक उदाहरणे ऐकून अगदी त्याच्या विसंगत वागले जाते. आई-वडील मुलीला मुलाप्रमाणे वाढवतात त्यांच्या बरोबरीने समाजात वावरता यावे यासाठी त्यांना योग्य ते शिक्षण देतात,पण लग्नाच्या वेळी हेच आई-वडील जे ताठ मानेने सांगतात माझी मुलगी आज डॉक्टर आहे, इंजिनियर आहे , त्यांना हुंडा पध्दतीमुळेच वरपक्षापुढे नमावे लागते.वधूपक्षापेक्षा  वरपक्षाला जास्त महत्व देण्यात  येते.

मध्ये आमीरच्यासत्यमेव जयतेया शो मधून याच अनिष्ठ रुढीला वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. पण या चालीरीती वर्षानुवर्षे वाढतच चाललेल्या दिसतात. आज-काल मुला मुलींच्या पसंतीच्या आधी "तुम्ही किती देणार???" हा प्रश्न विचारला जातो. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मुलगा वू मुलगी दोघे कमावते असले तरी या गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते. लाखांवर पैसा आणि किलोभर सोन्यात मुलीचा सौदा केला जातो. प्रत्तेक बापाला आपली मुलगी सोन्याहून प्रिय असणारच,तिच्या सुखासाठी सगळे मान्यच  केले जाते. पण कुठपर्यंत??? "लालचका कोई अंत नही होता" कुठेतरी आपले विचार बदलले पाहिजेत.

म्हणतात प्रत्तेकाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. पण मने जुळण्याच्या आधी इथे तोलामोलाची भाषा केली जाते. लग्न म्हणजे हिशेबाच्या वहीसारखी गत झाली आहे. पंचवीस वर्षे लाडात वाढलेली मुलगी एका नवीन प्रेमाच्या बंधनात बांधली जाणार असते. पण ते प्रेम जर पैशात मोजले जात असेल तर त्या मुलीने काय करावे असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.

हुंडा पध्दतीचे निर्मूलन करणे म्हणजे आपली मानसिकता बदलण्याचे मोठे आवाहन सर्व समाजापुढे आहे. हुंडा पध्दतीविषी जी मानसिकता समाजात आहे ती बदलणे तरुण पिढीच्या  युवा शक्तीच्याच हाती आहे.एक चांगला विचार माणसाचे आयुष्य बदलू शकतो आणि हि युवाशक्ती सुसंस्कृत समाज घडवू शकते.

या लेखातून फक्त एवढेच सांगायचे होते कि,"गरज आहे ती फक्त नजर बदलण्याची...दृष्टीकोन बदलण्याची.....विचार बदलण्याची....क्षितिजाकडे पाहण्याच्या दृष्टीची.........."





                                                                                    प्रा.रोहिणी अर्जुनराव शिंदे.
                                                                 2beyondthedestination@gmail.com

No comments:

Post a Comment